State Bank of india : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. एसबीआयने पुढील ५ वर्षांत आपल्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये महिलांची संख्या सध्याच्या २७% वरून ३०% पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
एसबीआयमध्ये सध्या २.४ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत, जे देशातील कोणत्याही संस्थेतील आणि बँकिंग क्षेत्रातील सर्वाधिक कर्मचारी आहेत.
फ्रंटलाइनमध्ये महिलांचा सहभाग जास्त
एसबीआयचे उप व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य विकास अधिकारी किशोर कुमार पोलुडासु यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली.
पोलुडासु म्हणाले, "जर आपण फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा विचार केला, तर त्यामध्ये सुमारे ३३% महिला आहेत. परंतु, एकूण कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग २७% आहे. त्यामुळे, हे प्रमाण वाढवण्यावर आम्ही काम करत आहोत आणि महिला कर्मचाऱ्यांची संख्या ३०% पर्यंत नेण्याचे आमचे लक्ष्य आहे."
महिलांसाठी उत्तम कार्यस्थळ
बँक सर्व स्तरांवर महिलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारे कार्यस्थळ तयार करू इच्छिते. यासाठी एसबीआय विशेष कार्यक्रम राबवून नेतृत्व क्षमता आणि काम-जीवन संतुलन वाढवत आहे.
महिलांसाठी उचललेली प्रमुख पाऊले
क्रेच भत्ता : बँकेकडून कार्यरत मातांना क्रेच भत्ता दिला जातो.
फॅमिली कनेक्ट प्रोग्राम : कुटुंबासोबतच्या संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी 'फॅमिली कनेक्ट प्रोग्राम' आयोजित केला जातो.
ट्रेनिंग कार्यक्रम : मातृत्व रजा, दीर्घ रजा किंवा आजारपणामुळे सुट्टीवरून परत येणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी खास ट्रेनिंग प्रोग्राम चालवले जातात.
वाचा - गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
'एम्पॉवर हर' उपक्रम
पोलुडासु यांनी 'एम्पॉवर हर' या मुख्य उपक्रमावर जोर दिला. या उपक्रमाचा उद्देश महिलांना नेतृत्व भूमिकेसाठी ओळखणे, मार्गदर्शन करणे आणि भविष्यासाठी उच्च महिला अधिकाऱ्यांची मजबूत टीम तयार करणे हा आहे. यामध्ये लीडरशिप लॅब आणि कोचिंग सत्रांचा समावेश आहे. एसबीआयची देशभरात ३४० हून अधिक शाखा आहेत, जिथे फक्त महिला कर्मचारी कार्यरत आहेत आणि ही संख्या भविष्यात आणखी वाढेल.
एसबीआय आपल्या मालमत्तेच्या बाबतीत जगातील शीर्ष ५० बँकांमध्ये गणली जाते आणि त्याला 'बेस्ट एम्प्लॉयर' म्हणूनही अनेक संस्थांनी मान्यता दिली आहे. हे आकडे बँकेची सर्वसमावेशकतेची बांधिलकी दर्शवतात.